Mahatma Phule Birth Anniversary 2023 : वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाल्याची कथा आपण लहानपणापासून ऐकलेली असते. ही गोष्ट बरीच जुनी असल्याने काही लोक ती खरी आहे की, नाही अशी शंका घेतात. पण अलिकडच्या काळातही अशा घटना घडल्याची उद्याहरणं आपल्याला बघायला मिळतात. याचंच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले.
त्यांना मारायला आलेले दोन मारेकरी नंतर त्यांच्याच चांगुलपणा पुढे नतमस्त होऊन सहकारी बनले. जाणून घ्या काय आहे कहाणी
महात्मा फुलेंनी महिला आणि वंचित, शोषित शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. लोकांची बोलणी, टोमणे, प्रसंगी शिव्या खाव्या लागल्या. काहींनी त्यांच्यावर शेणही फेकले. पण ते आपल्या जीवित कार्यापासून ढळले नाहीत. हे पाहून त्यांना जीवे मारण्यासाठी दोन मारेकरी पाठवले होते.
मध्यरात्री झोपेत फुलेंना खुडबूड ऐकू आल्याने जाग आली. घरात समईच्या मंद प्रकाशात दोन अंधुक आकृत्या दिसल्या आणि कोण आहे रे तिकडे असं त्यांनी जोरात विचारलं. त्यावेळी एक मारेकरी म्हणाला तुमचा निकाल लावायला आलोय. तर दुसरा ओरडला तुम्हास यमसदनास धाडावयास आलो आहोत.
त्यावर फुलेंनी विचारले मी तुमचं काय वाईट केलं आहे, तर मला मारायला आलात?
यावर ते दोघे म्हणाले तुम्ही आमचे काही वाईट केले नाही पण आम्हाला तुम्हाला मारायला पाठवले आहे.
मला मारुन तुमचा काय फायदा असं फुलेंनी विचारले.
ते म्हणाले आम्हाला प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत.
हे ऐकताच फुले म्हणाले, अरे वा मला मारुन तुमचा फायदा होणार तर, हे घ्या माझे डोके. ज्या गरीब जनतेच्या कल्याणासाठी झटण्यात मी धन्यता मानली त्यांनीच माझ्या गळ्यावरून सुरी फिरवावी हे मी माझे सद्भाग्य समजतो. चला आटपा. माझे आयुष्य दलितांकरीताच आहे. काहीही झाले तरी माझ्या मरणाने गरीबांचेच हित होत आहे.
त्यांच्या या उद्गाराने मारेकरी भानावर आले. त्यांनी महात्मा फुलेंची माफी मागितली. उलट ज्यांनी तुम्हास मारावयास पाठवले त्यांना मारण्याची परवानगी द्या असं ते म्हणाले.
ही सूड बुद्धी नसावी अशी समज फुलेंनी त्यांना दिली आणि ते दोघे फुलेंचे सहकारी झाले. यातील एकाचे नाव रोडे तर दुसरे पं. धोंडिराम नामदेव.
ही चार-पाच वाक्ये एखाद्याचं संपूर्ण जीवन कसं बदलवू शकतं असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. पण महात्मा फुले ही वाक्ये फक्त बोलले नाहीत तर जगले आहेत. त्यांच्या जीवनाचा तो सार आहे. त्यांनी केवळ शोषितांसाठी आयुष्य वेचले नाही तर त्यांनी दिलेले विचार आजही तंतोतंत लागू होतात आणि समाजाला दिशा देणारे आहेत.